- May 27, 2019
आलिशान “मराठमोळ्या” वाड्यात रंगणार बिगबॉस मराठी सिझन 2

मुंबई २७ मे, २०१९ :घर म्हणजे चार भिंती नसून प्रत्येकालाच आपलीशी वाटणारी हक्काची जागा… प्रत्येक घराला घरपण हे त्यात रहाणाऱ्या माणसांमुळे येत असत. असचं एक घर मराठी टेलिव्हिजनवर मागील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आलं…या घरावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं, त्यातील सदस्यांना आपलसं केलं आणि आता तेच घर परतय पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात… आणि ते म्हणजे बिग बॉस मराठीचं घर. या घरामध्ये यावर्षी कोणते सदस्य जाणार याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे, पण त्याहून जास्त उत्सुकता आहे यावर्षीचे घर कसे असेल हे जाणून घेण्याची ? काय विशेष असेल ? काय बदल करण्यात आले असतील? बिग बॉस मराठीचं या सिझनमधील घर खूप खास आणि आलिशान असणार आहे … या घराला अस्सल मराठमोळ्या वाड्याच रूप देण्यात आले आहे. प्रत्येक सदस्याला घरात जाताच अगदी स्वत:च्या घरी गेल्याचा फील येणार हे नक्की !बिग बॉस मराठीच या सिझनच स्वप्नवत घर यावर्षी देखील उमंग कुमार यांनी साकारले आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल करण्यात आले आहेत…सगळ्यात पहिले घरामध्ये दाखल झाल कि, एक गोष्ट अगदी ठळकपणे दिसून येते ती म्हणजे घरामध्ये रंगांचा अतिशय सुंदररित्या केला गेलेला उपयोग आणि त्यामुळेच घर प्रसन्न, आकर्षक वाटतं. त्यानंतर नजरेस पडत लिंबू – मिरची… बिग बॉसच्या सुंदर घराला कोणाची नजर लागू नये म्हणून ते अगदी समोरच लावण्यात आले आहे… घराच्या समोर मोठ आंगण आहे… स्विमिंग पूल, झोपाळा देखील आहे ज्यावर बसून सदस्य गप्पा मारतील,आपली दु:ख, आपल्या घरच्या आठवणी सांगतील, काही विशेष योजना आखताना दिसतील. सदस्यांच्या आरोग्य आणि फिटनेसला लक्षात घेता खास व्यायाम शाळा देखील असणार आहे… तसेच घराच्या बाहेर एक हातगाडी ठेवण्यात आली आहे जी लक्ष वेधून घेते… यावेळेस घरामध्ये जेल देखील दाखल करण्यात आले आहे … परंतु ते जेल नसून “अडगळीचीखोली” असणार आहे आता याचा कश्यासाठी आणि काय उपयोग होईल ते लवकरच प्रेक्षकांना कळेल…

घरामध्ये प्रवेश करताच कळून येत कि, अतिशय बारकाईने घराच्या प्रत्येक भागावर, कोपऱ्यावर आणि गोष्टींवर काम केले आहे … घराचा सगळ्यात महत्वाचा आणि महिला सदस्यांचा प्रिय असलेला भाग म्हणजे “स्वयंपाक घर”…स्वयंपाक घरामध्ये माती – तांब्याची भांडी,पाटा वरवंटा अश्या गोष्टीचा आकर्षकपणे वापर केलेला दिसून येतो.

यानंतर लिव्हिंग रूम मध्ये वापरण्यात आले रंग खूप फ्रेश आहेत, अतिशय सुंदर प्रकारे रंगांचे संयोजन केले आहे. अत्यंत नाविन्यपूर्ण अशी संकल्पना घेऊन उमंग कुमार यांनी लिव्हिंग रूम आणि किचन या भागांमध्ये रंग, वेगवेगळया गोष्टी वापरल्या आहेत… जसा वाड्याचा कौल, त्यावर बसलेल्या चिमण्या लक्ष वेधून घेतात… याचबरोबर अतिशय आकर्षक “नक्षीकाम”, वारली पेंटिंग देखील केलेले दिसून येते.

घरामध्ये असा कुठलाही भाग नाही जो नजरेआड होईल… प्रत्येक जागी भिंत नसून काचेच्या दरवज्यांचा वापर करण्यात आला आहे. मागील वर्षी मुलींच्या खोलीमधील एक बाब प्रेक्षक आणि सदस्य यांना आवडली आणि ती म्हणजे “नथ”… हा अलंकार स्त्रियांच्या अगदी जवळचा दागिना मानला जातो. मोती, पाचू आणि माणिक यांनी सुशोभित असलेली नथ आणि त्याचबरोबर मोठ्या आकाराची घुंगरूची पट्टीदेखील मुलींच्या खोलीची शोभा अजूनच वाढवणार आहे असे म्हणायला हरकत नाही.याचबरोबर मुलांची रूम देखील आकर्षकप्रकारे तयार करण्यात आली आहे. यानंतर या सिझन मध्ये सर्वाधिक चर्चा होईल ती म्हणजे तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची…

आतमध्ये शिरताच एका भिंतीवर फेटे घातलेले पोपट यांचे आकर्षक चित्र आणि दुसऱ्या भिंतीवर रंगेबिरंगी बांगड्या…घरात येणारी प्रत्येक मुलगी याच्या नक्कीच प्रेमात पडेल यात शंका नाही.

एक अशी रूम ज्यामध्ये येऊन सदस्य आपलं दु:ख बिग बॉसला सांगतात, अशी रूम जिथे येऊन ते दुसऱ्या सदस्यांना घराबाहेर जाण्यासठी नॉमिनेट करतात, अशी रूम ज्यामध्ये बिग बॉस काही गुप्त कार्य सदस्यांना देतात म्हणजेच “कन्फेशन” रूम… वेगवेगळे रंग, झुंबर यांचा वापर करून यावेळेसची रूम तयार करण्यात आली आहे.

कधी न पाहिलेल्या आणि कल्पना सुध्दा न केलेल्या गोष्टी या घराला आलिशान वाड्याचे रूप देण्यासाठी वापरण्यात आल्या आहेत. बिग बॉसच्या या घरामध्ये आता काय घडेल ? हे बघणे रंजक असणार आहे…
